​विवेकी विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन

विवेकी विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन

– रवींद्र रुख्मिणी पंढरीनाथ.
तर्कशुद्ध विचार व विश्लेषण करण्याची रीत हा विज्ञानाचा गाभा आहे. कोणी व्यक्ती, ग्रंथ, विचारप्रणाली सांगते म्हणून मी एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही, तर जी बाब प्रयोगाने सिद्ध करता येते, जी तर्काच्या आधारावर टिकते, तीच मी स्वीकारेन हा झाला वैज्ञानिक बाणा. हा वैज्ञानिक दृष्टिकोन जनसामान्यांमध्ये रुजविणे हे आपणा सर्वाचे कर्तव्य आहे, असे भारतीय संविधानाचा अनुच्छेद ५१क आपल्याला सांगतो.
एकविसाव्या शतकातही आपल्या देशात देवदासीसारख्या परंपरा टिकून आहेत. जात्याभिमानाच्या किंवा चेटूक केल्याच्या विकृत कल्पनांमधून येथे हत्या, नरबळीच्या घटना घडतात. ग्रहण, मासिक पाळी यांसारख्या नैसर्गिक घटनांबद्दल सुशिक्षित म्हणविणाऱ्यांच्या मनात आजही जुनाट कल्पना ठाण मांडून आहेत.  या सर्व बाबी आपल्या समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला नसल्याच्याच द्योतक नव्हेत काय? या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांत देशात विज्ञानाला उत्तेजन देण्याऐवजी त्या जागी छद्म-विज्ञानाला – विज्ञानाचा बुरखा पांघरलेल्या अवैज्ञानिक विचारसरणीला – प्रस्थापित करण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले जात आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीला लागला तर तरुण पिढी पुराणातल्या वांग्यांवर विश्वास ठेवणार नाही, म्हणून हुशार मंडळी आता पुराणातल्या वांग्यांना खोटय़ा विज्ञानाची फोडणी घालून त्यांच्यापुढे वाढत आहेत. गणपतीचा जन्म हे जगातील प्लास्टिक सर्जरीचे पहिले उदाहरण आहे, शंभर कौरव म्हणजे जेनेटिक इंजिनीअरिंग, प्राचीन काळी आमच्या देशात जमिनीवर अनश्व रथ (म्हणजे मोटारगाडय़ा) व आकाशातून विमाने फिरत असत अशा बाबी आता सोशल मीडियातून, थोरामोठय़ांच्या भाषणांतूनच नव्हे तर पाठय़पुस्तकांतून सांगितल्या जात आहेत. गेल्या वर्षी राष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत (इंडियन सायन्स काँग्रेस) ‘प्राचीन भारतातील विमानविद्या’ या विषयावर एक तथाकथित शोधनिबंध वाचला गेला. मध्य प्रदेश सरकारने नुकतीच सरकारी रुग्णालयांत डॉक्टरांच्या जोडीला ज्योतिषांना बसवून रुग्णांची कुंडली मांडून त्याआधारे उपचार सुरू करण्याची योजना जाहीर केली आहे. म्हणजे विज्ञानाची उचलबांगडी करून त्या जागी छद्मविज्ञानाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा तर सरकारचा विचार नाही ना, अशी शंका अनेक वैज्ञानिकांना येऊ  लागली आहे. म्हणूनच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे ही आपली संवैधानिक जबाबदारी असल्याची जाणीव सरकारला व जनतेला करून देणे आवश्यक ठरते. केवळ वैज्ञानिक आधार असणाऱ्या गोष्टीच शालेय शिक्षणक्रमातून मांडल्या जाव्या व पुराव्याधारित विज्ञानाच्या आधारावर देशाची धोरणे आखली जावीत, हा शिक्षणाचा गाभा असला पाहिजे.
भारतीय परंपरा म्हणजे काय, पारंपरिक ज्ञानाला विज्ञान मानायचे की नाही, असे प्रश्नही आपण विचारायला हवेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रश्न विचारणे, मनातल्या शंका दाबून न ठेवता त्या प्रकट करणे हे वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे जाण्याचे पहिले पाऊल आहे. जिज्ञासा, कुतूहल यांना एके काळी भारतीय परंपरेत नक्कीच महत्त्वाचे स्थान होते. ‘अथाऽतो ब्रह्मजिज्ञासा’ असे आवाहन प्राचीन ग्रंथांतून केलेले आपल्याला दिसते. त्यामुळे धातुशास्त्र, कृषिशास्त्र, आयुर्वेद अशा अनेक क्षेत्रांत भारताने प्रगती केली होती; पण नंतरच्या काळात ही परंपरा खंडित झाली. ‘गप्प बसा’ संस्कृती वाढीला लागली. पुरोहितशाहीने ज्ञानाच्या वाटा अडवून धरल्या. ‘संशयात्मा विनश्यति’ हे आपले ब्रीदवाक्य बनले. त्यातून अंधश्रद्धा फोफावल्या, सामाजिक-सांस्कृतिकच काय, तर आर्थिक प्रगतीही खुंटली. साऱ्या जगाशी वस्तू व ज्ञानाची देवाणघेवाण करणाऱ्या देशात समुद्र ओलांडणे हे पाप ठरविण्यात आले. परिणामस्वरूप या ज्ञानशाखांतही साचलेपण आले. आयुर्वेदातील प्रश्नांवर झडणाऱ्या परिषदा, केसस्टडीजवरील चर्चा, वादविमर्श बंद पडले. संशोधन, नवी ज्ञाननिर्मिती यांचा वेग आधी मंदावला, नंतर थंडावला. हे वास्तव आपण मान्य केले तर आपण वृथाभिमानाच्या सापळ्यात सापडणार नाही. त्यासाठीही वैज्ञानिक दृष्टिकोनच आपल्याला मदत करील. विमान, रथ, जेनेटिक इंजिनीअरिंग, प्लास्टिक सर्जरी ही सर्व तंत्रज्ञाने आहेत. त्यांचा विकास होण्यापूर्वी समाजात त्यांच्याशी संबंधित विज्ञानशाखांचा विकास होणे आवश्यक असते. हे एकदा कळले, की मग या विज्ञानशाखांचा मागमूस नसताना आपल्या देशात असे तंत्रज्ञान विकसित होणे शक्य नाही हे आपल्याला सहजच कळेल. विमानशास्त्रावरील शोधनिबंधात दाखवलेल्या चित्रांवरून खरेखुरे विमान बनवून ते उडवून का दाखवत नाहीत, असा प्रश्नही मग आपण स्वत:च विचारू शकू. आजच्या विज्ञानाचे निकष लावून गोमूत्रापासून पुष्पक विमानापर्यंतचे दावे आपण तपासून पाहावे असा अभिनिवेशहीन, विवेकी विचार आपल्याला मग करता येईल.

Add a Comment

Your email address will not be published.