शाहू महाराजांना पत्र.

“शाहू महाराजांना पत्र.”

Image may contain: 1 person, standing

प्रति…
छत्रपती शाहू महाराज यांच्या सेवेशी…
दत्तकविचा मानाचा मुजरा.
राजे…
परवा तुमची जयंती होती म्हणून..
what’s up ,face book वर तुमचं गुणगान चाललं होतं. मानाचे
मुजरे झडत होते.
गुलाब पुष्पांच्या हारांनी काल तुम्ही सजला होता फोटोत.
म्हणून मी परवा काही बोललो नाही.
घोषणांनी साऱ्या शाळा,कॉलेजेस दुमदुमले होते.
तोंड पाडून काहींनी तुमच्यावर भाषणंही केलीत.
मग घरी गेले ,जेवले ,झोपले,झालं….
त्यांनी एक दिवस तुम्हाला आठवून आपलं कर्तव्य पार पाडलं.
परवा fb ,व्हाट्स ऍप, वर तुम्ही ब्रँड झाला होतात राजे.
पण….
तुमच्या कर्तृत्वाची किती जणांनी दखल आणि आदर्श घेतला??
हा एक प्रश्नच आहे.
राजे तुम्ही केलेल्या पुरोगामित्वाच्या प्रबोधनाला लोकं विसरलीत.
तुमची आठवण लोकांना फक्त जयंती पुरतीच येते. हे बघून दुःख वाटतं.
म्हणून तुम्हाला हा पत्र लिहिण्याचा प्रपंच्य केलाय मी.
कृपया या अफाट विश्वाच्या कोणत्याही कोपर्यात असाल तर हे पत्र जरूर वाचा हि अपेक्षा व्यक्त करतो.
राजे….
तुमच्यामुळे कोल्हापूर जिल्हा समृद्ध आहे. सगळीकडे आनंदी आनंद आहे. सगळ्यांना पाणी मुबलक मिळतंय.
हे तुमच्याच दूरदृष्टीमुळेे.
राजे तुम्ही बांधलेलं “राधानगरीचं”
समृद्ध धरण आजही तुमच्या कर्तृत्वाची साक्ष देत ताठ मानेनं उभं आहे.पोटात माणसं जगवण्याचं अम्रुत घेऊन.
धरण क्षेत्रात भूकंप होऊ नये म्हणून.तुम्ही त्या ८ किलोमीटर एरियात बोर मारून शिसे ओतलंय. त्यामुळे कितीही भूकंप झाला तरी राधानगरी धरणाला काही होणार नाही.हि तुमची दूरदृष्टी किती वाखाणण्याजोगी.
धरणाचा आकार तर सरस्वती च्या चिन्हासारखा आहे.
त्याच सरस्वतीच्या आकारातल्या धरणाचं पाणी पिऊन आज गाई, गुरं, मुलं ,माणसं सुखी आहेत.
राजे…
तुम्ही केलेल्या मोफत शिक्षणाच्या कायद्याला आताची शिक्षण पद्धती काय समजणार.
सारं डोनेशनवर चाललंय आजकाल.
डोनेशन कमी शिक्षण कमी असं चाललंय आता.
तुम्ही चालू केलेली वेगवेगळ्या जाती धर्माच्या विद्यार्थ्यांची वस्ती गृह आजही आहेत कोल्हापुरात.
“माझी जनता.. माझी रयत प्राथमिक शिक्षण घेऊन समृद्ध झाली तर ..मी स्वतःला धन्य समजेन” असं तुम्ही म्हणाला होता.
तुमचं स्वप्न पूर्ण झालं.पण जनता तुम्हाला विसरली राजे.
वर्षानुवर्षे चाललेल्या सनातनी व्यवस्थेला सुरुंग लावण्याचं काम तुम्ही केलत राजे.
सर्वधर्म समभाव हा नारा तुम्ही जपलात.
पूर्वी अस्पृश्यानां मंदिरात प्रवेश नव्हता. तो प्रवेश तुम्ही मिळवून दिलात.
तुमच्या मुळेच पूजा अर्चेचा मान सगळ्यांना मिळाला.
हि एक ऐतिहासिक गोष्ट म्हणावी लागेल.
जाती व्यवस्था मुळापासून उखडून टाकण्यासाठी तुम्ही केलेल्या गोष्टीपैकी एक गोष्ट म्हणजे….
गंगाराम कांबळे.
या गंगाराम कांबळेला. तुम्ही स्वतः हॉटेल काढून दिलंत. आणि रोज त्या दलित व्यक्तीच्या हातचा चहा तुम्ही त्याच्या हॉटेलात जाऊन प्यायचात.
हे तुमच्या निधर्मीत्वाचं लक्षण होतं.
आज तो एरिया “पापाची तीकटी” म्हणून कोल्हापुरात ओळखला जातो.
राजे ..गंगाराम कांबळे ला तुम्ही लोकांचा मनात तुमच्या बरोबर अमर केलत.
राजे तुम्ही परदेशातून आणलेली तीन मोठी घड्याळं आजही आहेत कोल्हापुरात.पण बंद स्थितीत.
कारण आम्हाला ते चालू करायला वेळ कुठं आहे.
ग्लोबल झालोय आम्ही आता.
राजे..
तुम्ही लोकांच्या बांधाबांधावर गेलात.
पिठलं भाकरी खाल्लीत. प्रजेवर लेकरांसारखी माया केलीत.
कोल्हापूर संस्थान सुदृढ राहावं म्हणून तुम्ही स्वतः कुस्ती ला प्राधान्य दिलंत.
तालमी उभ्या केल्या.लोकांना व्यायामाचं महत्व सांगितलं.
राजे ..आज जगाच्या पाठीवर आम्ही कुठेही गेलो तर आमच्या शरीरयष्टी वरून लोकं म्हणतात.
“कोल्हापूरचा आहेस का रे तू?
याचं सारं श्रेय तुम्हाला जातं राजे.
“सर्वास पोटास लावणे आहे”
असं शिवाजी महाराज म्हणाले होते.
तो वारसा शाहू मिलची स्थापना करून तुम्ही चालवलात.
लोकांच्या हाताला काम दिलंत.
आणि लोकांच्या शेतमालाला भाव देण्यासाठी “मार्केट यार्डची” स्थापना केलीत.
आज तिथूनच साऱ्या जगाला कोल्हापूरच्या गुळाची पार्सल होते.
राजे..
तुमचं कलाप्रेम तर काय सांगावं…
कित्येक कलाकारांना तुम्ही
राजाश्रय दिलात. त्यांची कला समृद्ध केलीत.
बालगंधर्वांना घडवण्यात तुमचा सगळयात मोठा वाटा आहे.
बालगंधर्वांना तुम्ही लागेल ती मदत केलीत.
हे सगळं विसरली असतील लोकं.
पण तुम्ही नसता तर बालगंधर्व घडला नसता.
राजे…
तुम्ही कला ,क्रीडा,साहित्य,कुस्ती,शेती,माणुसकी हे सारं सारं जपलत.
आपलं आयुष्य खर्ची घातलत.
पण काय मिळालं तुम्हाला???
संभाजी महाराजांसारखी तुमची बदनामी होत राहिली.
न घडलेल्या घटनेचा प्रचंड प्रमाणात षडयंत्र रचून तुम्हाला बदनाम करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला.
पण सोन्यासारखं मुशीतून तावून सुलाखून तुम्ही तुमची सत्यता पटवुन दिलीत.
या जगात चांगल्याला किंमत नसते राजे.
खोटं मात्र हातोहात खपवलं जातं.
राजे त्रास होतो हो असं काहीतरी बदनामीकारक ऐकलं कि.
लोकांच्या तोंडात तुम्ही फक्त शिवीच्या रुपात उरलाय.
तुमच्याच मातीतली माणसं आज तुमचीच हेटाळणी करतांना बघून पित्त खवळतं राजे.
शिवजयंती साजरी होते तशी शाहू जयंतीही मोठया उत्साहात साजरी झाली पाहिजे.
पण तसं होत नाही.
हे बघून मला कोल्हापूरकर म्हणून घ्यायची लाज वाटते राजे.
आमच्या सारख्या लेखकांच काही चालत असतं तर तुमची हेटाळणी करणाऱ्या लोकांना शब्दांनी फोडून काढलं असतं.
राजे..
तुमच्या जयंती निमित्य घातलेले तुमच्या फोटोवरील हार…
उद्या निर्माल्यात जमा होतील.
तसे तुमचे विचारही आजच्या पिढीनं निर्माल्या सारखे विसर्जित केलेत.
हे असं पाहतो तेव्हां मी अस्वस्थ होतो राजे.
म्हणून तुम्हाला हा पत्र लिहायचा प्रयत्न केलाय मी.
गुस्ताखी माफ असावी राजे.
पण तुम्ही पुन्हा या इकडं. कोणत्याही स्वरूपात.
तुमच्या उत्तराची हा दत्तकवी वाट बघतोय.
वाट बघतोय.
कळावे
आपला
दत्ता गुरव.
दत्तकवी.
मोबा- ८६०५५२३६१८.
७०२८१७५१५८.

(या लेखाचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत.
सदर लेखाची कॉपी आढळल्यास
योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. याची कृपया नोंद घ्यावी.)

Add a Comment

Your email address will not be published.