व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी

कांजुरमार्गपाठोपाठ राज्यातील अन्य भागांमध्येही मोदींविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या तरुणांना आणि काही पत्रकारांनाही नोटीस बजावल्याचे समोर येत आहे. सोशल मीडियावर अशा काही नोटीस व्हायरल होत असून कांजुरमार्ग वगळता अन्य कोणत्याही नोटीशीला पोलिसांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीदेखील यावरुन राज्य सरकारवर टीका केली. ‘महाराष्ट्रात अनेकांना पोलिसांकडून येत असलेली नोटीस ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे’, अशी टीका त्यांनी केली. राज्यातील महागाई, बेरोजगारी व मंत्र्यांच्या भ्रष्ट्राचाराविरुद्धचा जनआक्रोश दडपून टाकण्यासाठी राज्य सरकारकडून पोलीसी बळाचा गैरवापर सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी कितीही कोंबडे झाकले तरी जनआक्रोशाचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही असेही मुंडेंनी म्हटले आहे. टीका सहन होत नसेल तर सत्ता सोडावी. टीका करणाऱ्यांच्या मागे  पोलीस लावण्याचा अर्थ सरकारचे अस्तित्व डळमळीत झाले आहे असेही त्यांनी म्हटले आहे. सरकारची पत्रकारांवर पाळत होती, आता पोलीस पत्रकारांना चौकीत बोलवून धमकावत आहेत. माध्यमांवरचा घाला हा लोकशाहीवरचा हल्ला असल्याचा दावा त्यांनी केला. सोशल मीडियावरील टीकेने सरकारच्या अस्तित्वाला धक्का दिला. त्यांची पोलखोल झाली असून पोलीस चौकशीचा ससेमिरा हा आणीबाणीपेक्षा भीषण असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Add a Comment

Your email address will not be published.